तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील कसई ते मंगरूळ या मार्गावरील मधल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये नालीचे आणि पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरात डासांची उत्पत्ती वाढून आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. अनेक वाहनचालकांना वाहने रस्त्यालगत उभी करून पायीच घराकडे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी स्वखर्चाने या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही रस्त्याची अवस्था सुधारली नाही. उलट त्या कामाचे बिल काढल्याची चर्चा परिसरात सुरू असून, या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सदर रस्ता शाळा, पाणी टाकी तसेच कारखान्याकडे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. याच मार्गाच्या पुढे शेतकऱ्यांची वस्ती आणि झोपडपट्टी असल्याने नागरिकांना दररोज या खराब रस्त्यावरूनच ये-जा करावी लागते. परिणामी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, हा रस्ता सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याची कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच संबंधित कामाची चौकशी करून दर्जेदार कामे करावीत, अशी मागणी कसई व मंगरूळ परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
