धाराशिव (प्रतिनिधी) - अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचे कट कारस्थान मनुवाद्यांकडून केले जात आहे. त्या माध्यमातून जाती जातींमध्ये प्रचंड जातीभेद निर्माण करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. हे कारस्थान कदापि आम्ही यशस्वी होऊ देणार नसल्याचा थेट इशारा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दि.28 जुलै रोजी दिला.

धाराशिव येथे उपवर्गीकरणाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आले असता त्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे धनंजय शिंगाडे, राजाभाऊ ओव्हाळ, कैलास शिंदे, अनिल हजारे, विकास बनसोडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, उपवर्गीकरणाच्या विरोधात केवळ बौद्ध समाज मोर्चा काढत आहे, असे नाही; तर अनुसूचित जातीमधील 59 जाती उपवर्गीकरणाला रस्त्यावर उतरून थेट विरोध करत आहेत. सोलापूरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मातंग समाजाने सहभागी होत आमचा आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध असल्याचे सांगितले आहे. मात्र, सध्याच्या मनुवादी सरकारची 'फोडा आणि राज्य करा' अशी रणनीती आहे. या रणनीतीच्या अनुषंगानेच आज जातीजातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मराठा-ओबीसी, नंतर आदिवासी व अनुसूचित जमाती, धनगर- मराठा असा वाद लावला आहे. देशात कोठेही उपवर्गीकरण झालेले नसताना राज्य सरकार महाराष्ट्रात उपवर्गीकरण लागू करण्याचा घाट घालीत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केले. तसेच आज सरकारकडे कोणताही इम्पेरियल डाटा नाही. मात्र केवळ राजकीय लाभ मिळवण्यासाठी उपवर्गीकरणाचा नाहक कुटील डाव रचला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे उपवर्गीकरणाची मागणी कोणीच केलेली नसताना आरक्षण उपवर्गीकरण लागू करून जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही जातीला आरक्षण दिले नाही. आरक्षण कोणत्याही एका जातीला दिले नसून त्यांनी ते एका अस्पृश्य असलेल्या सामाजिक घटकांना दिले आले. पूर्वी जाती वर्ण व्यवस्थ होती, त्यांच्या कामावरूनच जातीची नावे पडली आहेत, असे असताना, उपवर्गीकरण करून जातीमध्ये भेदभाव निर्माण करण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचा चुकीचा अर्थ काढून आणि काही मातंग समाजातील नेते स्वतःच्या फायद्यासाठी मातंग समाजाची दिशाभूल करीत आहेत. 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाच्या आधारे जर उप वर्गीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने चुकीचे निर्णय दिले तर संसदेने त्याबाबत कायदा करावा लागतो मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयापेक्षा जनताच सर्वोच्च असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. तसेच दिल्ली येथील जंतर मंतर वरील झालेल्या आंदोलनात विद्यार्थीच सर्वोच्च असल्याचे सर्व जगाने पाहिले आहे. त्यामुळे सरकारने जर जातीजातीमध्ये फूट पाडण्याचा उपोरीकरणाचा निर्णय घेतला तर जंतर-मंतरवर ज्या पद्धतीने आंदोलन झाले. त्यापेक्षाही अतिशय उग्र आंदोलन करून उपवर्गीकरण करण्याचा घाट हाणून पडणार असल्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला.


सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकीचा

मुळात, उपवर्गीकरणाच्या बाजूने देण्यात आलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकीचा आहे. 6 विरुद्ध 1 अशा मताने हा निर्णय देण्यात आला. त्या सहांमध्ये माजी सरन्यायाधीश भूषण गवई सुद्धा होते. वास्तविक पाहता, याच्या अगोदरच अनेक न्यायालयांनी उपवर्गीकरण होत नसल्याचे विविध प्रकरणांमध्ये स्पष्ट केले आहे. या दृष्टीने न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याचे आम्ही मानतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उपवर्गीकरण होऊ दिले जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.


सर्व जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात

अनुसूचित जातींमध्ये देशातील 59 जातींचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्वच जातींचा उपवर्गीकरणाला विरोध आहे. मातंग समाजाने देखील याला विरोध केला आहे. केवळ काही गोरे-गोमटे लोक उपवर्गीकरणाच्या बाजूने मोर्चे काढण्याचे काम करीत आहेत. अर्धा टक्का लोक सोडले तर साडे 58 टक्के लोक आमच्या सोबत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मातंग समाजासाठी शासनाने विविध योजना घोषित केल्या आहेत. त्यांना आम्ही कधीही विरोध केला नाही. अजूनही मातंग समाजाला योजना हव्या असतील, तर त्यांनी लढा द्यावा. आम्ही त्यांच्या सोबत राहू, असे आश्वासन आंबेडकर यांनी दिले.


आमदारकी, महामंडळासाठी खटाटोप

काहीजण सध्या उपवर्गीकरणाच्या बाजूने मोर्चे काढत आहेत. हा सर्व प्रकार आमदारकी आणि महामंडळाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी केला जात असल्याचा खळबळजनक आरोप करीत ते म्हणाले की, त्यांचे कारस्थान मातंग समाजाने ओळखणे गरजेचे आहे. बौद्ध समाजाने सर्व रूढी-परंपरा पाळणे सोडून दिले, घरातून देव देखील बाहेर काढले. त्यामुळेच आज विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवल्यामुळे बौद्ध समाज सर्वच बाबतीत पुढे गेला आहे. सद्यस्थितीत इतर समाजाने सुद्धा अशा पद्धतीने वर्तन ठेवले, तर निश्चितच त्या समाजाची सुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.


 
Top