भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यासह ग्रामीण भागात अवैध मटका आणि प्रतिबंधित गुटख्याचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी हे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रतिबंधित गुटखा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा असून, बार्शी आणि माणकेश्वर परिसरातून छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात गुटख्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप केला जात आहे. किराणा दुकाने, पानटपऱ्या तसेच इतर ठिकाणी गुटखा सहज मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी काही विक्रेत्यांवर कारवाई केली जात असली, तरी या कारवायांनंतरही गुटख्याची विक्री थांबलेली नसल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, तालुक्यात “कल्याण“ व “मुंबई“ या नावाने ओळखला जाणारा अवैध मटका व्यवसायही अनेक ठिकाणी सुरू असल्याचा आरोप होत आहे. गावागावांत एजंटांच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू असून, रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. विशेषतः युवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या जुगाराच्या विळख्यात अडकत असल्याने अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, अनेकदा संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नाही. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल वाढत असून, कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.


 
Top