भूम (प्रतिनिधी)-  तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा व्यापारी क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप महाराज गाढवे यांना मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या वतीने प्रतिष्ठेचा 'मराठवाडा व्यापारी भूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे आयोजित मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या 29 व्या वर्धापन दिन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 

गेल्या सुमारे 30 वर्षांपासून व्यापारी वर्गाच्या हितासाठी सातत्याने केलेले कार्य, व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडणे, संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि व्यापारी चळवळीत दिलेले मोलाचे योगदान याची दखल घेत गाढवे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. गाढवे यांच्या नेतृत्वाखाली भूम तालुका व्यापारी महासंघ अधिक सक्षम झाला असून, व्यापाऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यामुळे भूम तालुक्याची व्यापारी क्षेत्रातील ओळख मराठवाडाभर अधिक बळकट झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. 

पुरस्कार वितरण सोहळ्यास व्यापारी महासंघाचे लक्ष्मीकांत जाधव, दीपक खराडे, जयेंद्र महिंद्रगे, संतोष वीर,रणजीत साळुंके, अरविंद शिंदे, प्रज्ञानानंद सुकाळे, अनिल जाधवर, रामभाऊ मुंडेकर, अमोल तुळशी, भास्कर घुले, अंकुश मोरे, लक्ष्मण अंधारे, अशोक गाढवे आणि आनंद गाढवे उपस्थित होते. 


 
Top