तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूरचे रहिवाशी व  सुप्रसिद्ध उद्योजक  डी. के. अग्रवाल यांच्या परिवाराशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन विशाल अग्रवाल यांच्या मृत्यूच्या घटनेने तुळजापूर शहरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. शहरभर केतनला न्याय मिळाला पाहिजे या आशयाचे डिजिटल बॅनर झळकू लागले असून, केतनला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

मूळचे तुळजापूरचे असलेले अग्रवाल कुटुंब व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झाले असले तरी त्यांचे तुळजापूरशी घट्ट सामाजिक व कौटुंबिक संबंध कायम होते. सुप्रसिद्ध व्यापारी डी. के. अग्रवाल यांनी तुळजापूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. त्यांचे पुत्र विशाल अग्रवाल यांनीही पुण्यात व्यवसायाची यशस्वी वाटचाल करत तुळजापूरची ओळख कायम राखली. दरम्यान, केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी त्याची नियोजित वधू सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेने अग्रवाल परिवारासह तुळजापूरकरांनाही मोठा धक्का बसला आहे.

या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरातील विविध चौकांमध्ये आणि प्रमुख ठिकाणी “केतनसाठी न्याय हीच आमची मागणी, हीच तुळजापूरकरांची भावपूर्ण श्रद्धांजली“ अशा आशयाचे डिजिटल बॅनर लावण्यात आले आहेत. या माध्यमातून शहरवासीयांनी केतनला श्रद्धांजली अर्पण करत तपास निष्पक्षपणे करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

 
Top