भूम (प्रतिनिधी)- भूम बस स्थानकात शनिवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या पर्समधील सुमारे एक तोळ्याचे, अंदाजे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला भूम-वरदवाडी-बार्शी या एसटी बसमध्ये प्रवासासाठी चढत होती. त्यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेले. बसमध्ये बसल्यानंतर महिलेच्या लक्षात ही बाब आली. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याचवेळी बस स्थानक परिसरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती प्रवाशांनी दिली. एका प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील पाच हजार रुपयांची रोकडही अज्ञात चोरट्यांनी हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरात सक्रिय असलेल्या चोरट्यांच्या टोळीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दागिने चोरी करणारे संशयित कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अमलदार संदेश शिरसागर यांनीही बस स्थानकाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि पोलिसांना आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला असून, चोरीसह मारहाणीच्या घटनेचाही तपास सुरू आहे. या सलग घटनांमुळे भूम बस स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, बस स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढविण्याची आणि गर्दीच्या वेळेत विशेष सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
