वालवड जि.प. गटातील सर्व शाळांमध्ये मोफत शालेय साहित्य वाटप
नवनिर्वाचित जि.प. सदस्या जयश्रीताई काळे यांचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम
भूम, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने धाराशिव जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या सौ. जयश्रीताई बालाजी काळे यांच्या सौजन्याने वालवड जिल्हा परिषद गटातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, वह्या, रजिस्टर तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य वितरित केले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अधिक उत्साहाने करता येणार असून पालकांवरील आर्थिक भारही कमी होणार आहे.
या गावांतील विद्यार्थ्यांना लाभ
वालवड जिल्हा परिषद गटातील वालवड, वाल्हा, येमाईवस्ती, गणेगाव, पाटसांगवी, राळेसांगवी, हिवर्डा, चुंबळी, गोरमाळा, कृष्णापूर, कासारी, भोगलगाव, वारेवडगाव, सामनगाव, वरूड, ऊळूप, चिंचोली, नवलगाव, बुरुडवाडी, रामेश्वर आणि बऱ्हाणपूर येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.
शिक्षणाला प्रोत्साहन देणारा उपक्रम
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनसामग्री सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास यामुळे मदत होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढविणे, शाळेतील उपस्थिती सुधारणा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य
हा उपक्रम मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सूचनेनुसार तसेच श्री. दत्ता काळे (PTBS Group, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यासाठी माजी सभापती निलेश शेळवणे आणि उपसरपंच कृष्णा मोहिते यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
जयश्रीताई काळे यांची भावना
याबाबत बोलताना जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्रीताई काळे म्हणाल्या, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने शिक्षण घेऊ शकेल, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे."
या उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून स्वागत होत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.