धाराशिव (प्रतिनिधी)- विनोद, कौटुंबिक नातेसंबंध आणि हलक्याफुलक्या मनोरंजनाची मेजवानी ठरणारे ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ हे गाजलेले मराठी नाटक येत्या 5 मे रोजी धाराशिवमध्ये रंगणार आहे. या नाटकाचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या नाटकाचा प्रयोग 5 मे रोजी रात्री 8:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, धाराशिव येथे होणार आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे हे नाटक असल्याने रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने विशाल शिंगाडे यांनी केले आहे. मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जपणाऱ्या या नाटकातून विनोदासोबतच समाजातील वास्तवावर भाष्य करण्यात आले असून, प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडणारा हा प्रयोग ठरणार आहे. सशक्त अभिनय, नेटकं दिग्दर्शन आणि प्रभावी कथानक यामुळे हे नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. धाराशिवसारख्या सांस्कृतिक जाण असलेल्या शहरात अशा दर्जेदार नाट्यप्रयोगाचे आयोजन होत असल्याने नाट्यप्रेमींनी कुटुंबासह उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.