धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे शहीद दिनानिमित्त देशासाठी हसत हसत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरू या शहीदांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

प्रमुख वक्ते व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ विजयसिंह देशमुख यावेळी म्हणाले की, भगतसिंग यांच्यावर बालपणापासूनच देशाप्रती प्रेम होते. या तिन क्रांतिकारकांना ज्यावेळी फाशी देण्यात येत होती त्यावेळी फाशीचा दोर सुध्दा दुःखी होता. पण यांच्या चेहऱ्यावर हसू होते. जालियनवाला बाग हत्याकांड, लाला लजपतराय यांच्यावर झालेला अमानुष लाठीमार या घटनांमुळे हे तरुण पेटून उठले होते. भारत मातेच्या जमिनीची माती कपाळी लावुन हसतमुखाने फासावर गेलेले तरुण क्रांतिकारक यांना भारत कधीच विसरणार नाही. फक्त आजच्या तरुणांना या शहीदांची ते का शहीद झाले याची जाणीव असावी असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर आभार डॉ बालाजी गुंड यांनी मानले. सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top