तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूरसह संपूर्ण पंचक्रोशीत गुटख्याची अवैध आयात व विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप विविध संघटनांकडून केला जात आहे. तुळजापूर शहर व तालुक्यात कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध आयात होत असून ग्रामीण व शहरी भागात मोठमोठी गोदामे उभारून तेथून होलसेल पद्धतीने गुटख्याचा पुरवठा केला जात आहे. पुरवठादार वेगळा आणि वितरक वेगळा अशी संपूर्ण साखळी तयार करून गुटखा माफिया राजरोसपणे व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही ती केवळ कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे. तुळजापूर शहरासह ग्रामीण भागात खुलेआम गुटखा विक्री सुरू असून त्यावर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

गुटखा सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असतानाही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अवैध गुटखा विक्रीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून या गुटखा माफियांना कोणाचे आर्थिक पाठबळ आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे. तुळजापूर तालुक्यातील गुटखा विक्री पूर्णपणे बंद करून गुटखा माफियांवर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने  कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 
Top