तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरळी (खुर्द), आरळी (बु.), काळेगाव या अत्यंत महत्त्वाच्या प्रमुख जिल्हा मार्गाची गेल्या तब्बल 25 वर्षांपासून दुरवस्था कायम असून, या भागातील नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्ता पूर्णतः उखडून गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.
खराब रस्त्यामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याबाबत प्रशासनाकडून दीर्घकाळ कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही. काही वर्षांपूर्वी हा रस्ता जिल्हा नकाशावरूनही गायब असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे शासनस्तरावरून निधी मिळण्यात अडथळे आले.
परिस्थिती असह्य झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून स्वखर्चातून रस्त्याची डागडुजी केली. मात्र ही तात्पुरती उपाययोजना ठरली आणि काही काळातच रस्ता पुन्हा पूर्ववत खराब झाला. आता रस्ता नकाशावर समाविष्ट असूनही संबंधित विभागाकडून दुरुस्तीबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
जिल्ह्यातील गेल्या अनेक निवडणुकांमध्ये लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद या रस्त्याचा प्रश्न आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष,पंचायत समिती सभापती आदींकडे सातत्याने मांडण्यात आला. पण प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींनी रस्ता प्राधान्याने दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. मात्र निवडणुका संपल्यानंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या दुरवस्थाबाबत हा एकच प्रश्न विविध पक्ष नेते व प्रशासनाकडे मांडून मांडून स्थानिक लोकप्रतिनिधी ही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
आरळी बुद्रुकच्या या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर पडलेल्या लाखों खोल खड्ड्यांमुळे या मार्गावरून दररोज जाणारी शेकडो वाहने नादुरुस्त होत असून, वाहनधारकांना सतत सर्व्हिसिंगचा खर्च सहन करावा लागत असून या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनांना मोठे धक्के बसत असल्याने सस्पेन्शन, टायर, शॉकर, ब्रेक सिस्टीम यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, वारंवार पंचर होणे, वाहन घसरणे आणि अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत.
आरळी (खुर्द) आरळी (बु.) काळेगाव हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नसून, शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला असून, प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.नागरिकांच्या संयमाचा अंत होत असून, आता प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बस सेवा बंद; विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
रस्त्याची अत्यंत खराब अवस्था लक्षात घेऊन एसटी महामंडळाने या मार्गावरील बस सेवा काही काळ बंद केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तुळजापूरला जाणे कठीण झाले. अनेकांना शिक्षण सोडण्याची वेळ आली. खासगी वाहनांवर अवलंबित्व वाढले, ज्यामुळे खर्चही वाढला, ग्रामस्थांनी स्वतः रस्ता दुरुस्त केल्यानंतर काही प्रमाणात सेवा सुरू झाली, मात्र पुन्हा रस्ता खराब झाल्याने समस्या कायम आहे.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे अवघड झाले असून गर्भवती महिला, वृद्ध आणि गंभीर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतं आहे. प्रवासादरम्यान होणाऱ्या धक्क्यांमुळे मणक्याचे व सांध्यांचे आजार वाढले असून अनेक वेळा अपघात होऊन जखमींची संख्या वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
बाजारपेठेवर परिणाम; आर्थिक फटका
आरळी बुद्रुक हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या इंग्रजकालीन बाजारपेठेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या रस्त्याद्वारे परिसरातील दहा ते बारा गावांचा दैनंदिन संपर्क असतो. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापारी आणि ग्राहकांची ये-जा कमी झाली. बाजारपेठेची उलाढाल घटली,स्थानिक व्यवसायांवर परिणाम झाला परिणामी, या भागातील अर्थचक्र मंदावल्याचे चित्र आहे.
आमदारांकडे ठोस कारवाईची मागणी
स्थानिक नागरिकांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.“रस्ता तात्काळ दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.