धाराशिव - धाराशिव नगर परिषदेमध्ये पारदर्शक कारभार करण्याचा वादा निवडणुकीपूर्वी केला होता. मात्र सर्वसाधारण बैठकीमध्ये पारदर्शक कारभाराऐवजी संशय निर्माण करणारे निर्णय घेत आहेत. एका सत्ताधारी पदाधिकाऱ्याच्या प्लॉटला खास नगर परिषदेच्या नाट्यगृहापासून थेट समता नगरकडे रस्ता करण्यासाठी मिलिटरी हॉस्पिटल व नगर वाचनालय पाडून रस्ता देण्याचा ठराव सभागृहात मांडला गेला. हा विषय कोणी विषय पत्रिकेवर आणला ? असा प्रश्न सत्ताधारी भाजपचे गटनेते अमित शिंदे यांनी नगराध्यक्षांना विचारला. त्यावर नगराध्यक्ष ऐवजी मुख्याधिकारी नीता अंधारे यांनीच पालकमंत्र्यांनीच हा विषय मला घ्यायला सांगितल्याचे अजब उत्तर दिले. विशेष म्हणजे नगर परिषदेची सर्वसाधारण सभा यापुढे इन कॅमेरा घ्यावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्यांनी केल्यामुळे नगराध्यक्षांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या. मात्र, नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी एकाही विषया संदर्भात साधा चकार शब्दही सभागृहात उच्चारला किंवा बोललेला नाही. त्यांच्या ऐवजी त्यांचे नगरसेवक बोलबच्चन पती राहुल काकडे हेच कारभार हाकत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे शहरवासियांनी खास महिला नगराध्यक्षपदी निवडून दिलेले असताना शहरवासियांचा एक प्रकारे अवमानच केला आहे. या प्रकारामुळे नगराध्यक्ष काकडे 'मुक्या' अन् पती बोलबच्चन कारभार हाकणार का ? असा प्रश्न विरोधकांनी सभागृहात दि.१६ मार्च रोजी उपस्थित केला.
धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत समता नगर येथे भाजप पदाधिकाऱ्याचा प्लॉट आहे. त्याला रस्ता देण्यासाठी नगर परिषदेच्या नाट्यगृहापासून नगर परिषदेची संरक्षक भिंत तोडून मिलिटरी हॉस्पिटल व नगर वाचनालयाची बिल्डिंग तोडून त्याच्या मधोमध पुढे माने हॉस्पिटलकडे रस्ता देण्याचा घाट सत्ताधारी मंडळींनी घातला आहे. त्यासाठी तसा ठराव देखील विषय पत्रिकेत समाविष्ट केला. हा विषय समोर येताच सत्ताधारी पक्षाचे गटनेते अमित शिंदे यांनी हा विषय कोणी आणला ? असा प्रश्न विचारला. त्याला नगराध्यक्षांनी उत्तर देणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यांच्या ऐवजी मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी हा विषय पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेण्यास मला सांगितले असे उत्तर दिल्याने सभागृह अचंबित झाले. पाण्याच्या टाकीचे बांधकाम शाहू नगरमधील खुल्या प्लॉट (ओपी जागा) वर मागील अनेक दिवसांपासून सुरू केले असून त्यासाठी निधी देखील खर्च केलेला आहे. याबाबत नगरसेवक अक्षय जोगदंड यांनी अशा जागावर दहा टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम करता येत नाही असा आक्षेप घेतला. मात्र, त्याच कामाचा ठराव आजच्या बैठकीत मांडून बहुमताच्या जोरावर पारित केला आहे.
तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील चपने यांच्या दुकानालगत असलेल्या खुल्या जागेवर नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी कॉम्प्लेक्स उभारण्याचा ठराव देखील सत्ताधाऱ्यांनी मांडला. मात्र, शिवसेना (ठाकरे) चे नगरसेवक राजाभाऊ पवार यांनी शहरात वाहनांच्या पार्किंगसाठी एक ही जागा नाही. त्यामुळे तेथे कॉम्प्लेक्स करण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका घेत कडाडून विरोध केला. मात्र, तो देखील बहुमताच्या जोरावर संमत केला. तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील १४४/४ या खुल्या जागेवर विकसित करण्याचा ठराव मांडला आहे. ती जागा समता गृहनिर्माण सहकारी संस्थेची असून याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात न्यायालय प्रलंबित असल्याचे शिवसेना (ठाकरे) चे नगरसेवक नाना घाटगे यांनी निदर्शनास आणून दिले. तर राजाभाऊ पवार यांनी उजनी धरणातील पिण्याचे पाणी दूषित असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील लाखो नागरिकांना कॅन्सरने व्यस्त असल्याचे सांगत त्याची आवश्यक ती तपासणी करून घ्या असे सुचविले.
त्यावर सत्ताधाऱ्यांनी तुम्हीच सांगा कोणत्या तपासण्या करायच्या ? असा बेजबाबदारपणे उलट प्रश्न केला. या बैठकीत एएमआयएम पक्षाचे अजझर मुजावर यांनी कब्रस्तानसाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली. तर पठाण उजमा सबा अजहर खान यांनी ईदगाह मैदान येतील भिंत बांधणे तसेच ईदगाह मैदान परिसरातील लोखंडी कमान दुरुस्त करण्याची मागणी केली.
.........
मागील बैठकीत परवानगी शिवाय डिजिटल बॅनर लावायचा नाही असा ठराव सर्वानुमती घेतला होता. मात्र, त्यानंतर खुद्द नगराध्यक्षांनीच स्वतः घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन नियमबाह्यपणे शुभेच्छाचे बॅनर लावलेले आहेत. त्यामुळे कायदे करणाऱ्यांनी पाळायचा नसतो का ? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच शहरात डिजिटल बॅनर लावण्यासाठी २४ पॉईंट निश्चित करण्यात आले असून १५६ डिजिटल बॅनर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार असून तेंडरधारकांनीच लोखंडी अँगल बसवावेत असा ठराव देखील मागच्या बैठकीतच घेतलेला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात नगराध्यक्ष स्वतःच अयशस्वी ठरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.
