मुरुम / प्रतिनिधी
येथील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शुक्रवार १३ मार्च रोजी समाजशास्त्र विभागाच्या वतीने "सायबर क्राईम" वर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.प्रल्हाद सुर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय अस्वले होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मा.श्री.प्रल्हाद सुर्यवंशी यांनी "सायबर क्राईम" विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार वाढले असले तरी प्रत्येक व्यक्तीकडे ऑनलाईन व्यवहाराविषयीचे अज्ञान मोठ्या प्रमाणात आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी सायबर गुन्ह्यांला बळी पडू शकते. त्यामुळे सर्व व्यक्तीने सावध राहून संगणक व मोबाईल हाताळला पाहिजे. इंटरनेट, संगणक,मोबाईल किंवा डिजिटल उपकरणाचा वापर करुन केलेला कोणताही बेकायदेशीर गुन्हा म्हणजे सायबर क्राईम असून, पुढे बोलताना या डिजिटल युगात व्हॉट्सअँप इन्स्टाग्राम, फेसबुक च्या माध्यमातून मुलीची कशी फसवणूक केली जाते हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.तरुणांने अनावश्यक ॲपचा वापर टाळून,ऑनलाईन गेम्स पासून दूर राहिले पाहिजे.कोणत्याही अनावश्यक लिंक ओपन करू नये,आलेला ओटीपी कुणालाही शेअर करू नये,अन्यथा फार मोठी फसवणूक होऊ शकते. असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.सुर्यकांत रेवते आणि डॉ.संतोष सुरवसे यांनी हॅकिंग, फिशिंग, सायबर बुलिंग आणि मालवेअर हल्ला याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ.संजय अस्वले यांनी सायबर क्राईम पासून कसा बचाव करावा हे सांगून अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट,अनोळखी लिंक, बॅंक पासवर्ड यापासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे, असे सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ.पद्माकर पिटले, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रदीप पाटील, डॉ.ज्ञानोबा पडोळे, डॉ. सुमेध राजूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सैफ इनामदार यांनी, सुत्रसंचालन कु.अनिषा सुरवसे तर आभार प्रदर्शन डॉ.सुमेध राजूरकर यांनी केले. कार्यशाळेस सर्व प्राध्यापक, कर्मचारी व समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
