भूम (प्रतिनिधी)- कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यात विकास प्राधिकरण, राज्य कृषी विभाग, कृषी कार्यालय तसेच केव्हीके धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मल खवा क्लस्टर येथे खवा व द्राक्ष उत्पादकांसाठी क्षमतावाढ व निर्यात प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शेतकरी, खवा उत्पादक, एफपीओ, एफपीसी, एससी, एसटी घटक, महिला तसेच नवउद्योजकांना गुणवत्तापूर्ण खवा व द्राक्ष उत्पादन, ग्रेडिंग, पॅकिंग, प्रमाणन प्रक्रिया आणि निर्यातीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन करणे हा होता. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी निर्मल खवा क्लस्टर सभागृहात हा मेळावा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपेडा, मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक पांडूरंग बामणे, एमसीडी व्यवस्थापक पांडुरंग मोरे, आत्मा प्रकल्प संचालक विष्णू मिसाळ, जिल्हा उद्योग अधिकारी तांदळे तसेच कृषी अधिकारी अतुल ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी उपस्थित खवा उत्पादक व द्राक्ष बागायतदार यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस भूम, परंडा व वाशी तालुक्यांतील खवा व द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
