भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषद येथे अंदाजपत्रकावरील विचारविनिमयासाठी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला 21 नगरसेवक तसेच नगराध्यक्ष उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर 2022 ते 2025 या प्रशासक काळातील उत्पन्न व खर्चाच्या मुद्द्यावरून सभागृहात तीव्र खडाजंगी झाली. मुख्याधिकाऱ्यांसोबत नगरसेवकांचा शाब्दिक वाद रंगला. जनशक्ती नगर विकास आघाडीचे सदस्य आक्रमक होत अर्थसंकल्पातील कथित अवाजवी खर्चाबाबत स्पष्टीकरणाची मागणी करू लागले.
गटनेते रुपेश शेंडगे यांनी 2022 ते 2025 या कालावधीत झालेल्या सर्व खर्चाचा सविस्तर तपशील सभागृहासमोर मांडण्याची मागणी केली. नगरसेवक चंद्रमणी गायकवाड यांनी “हा केवळ आकड्यांचा खेळ असून कागदोपत्री कोट्यवधींचा खर्च दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या खर्चाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडली. नगरसेवक आबासाहेब मस्कर यांनी अर्थसंकल्प मंजूर करताना प्रलंबित विकासकामांसाठी स्वतंत्र तरतूद करून पुढील सभेत त्यावर चर्चा घ्यावी. अशी मागणी केली. बांधकाम सभापती अनिल शेंडगे यांनी काही कर्मचारी नगरसेवकांना आवश्यक माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. यावरून वातावरण अधिकच तापले.
सभेत नगराध्यक्ष संयोगिता गाढवे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी साठे, गटनेते सूरज गाढवे, सभापती अनिल शेंडगे, सभापती रामराजे कुंभार, सभापती नवनाथ रोकडे, नगरसेवक यशवंत थोरात, नगरसेवक विठ्ठल बागडे, नगरसेवक चंद्रमणी गायकवाड, नगरसेवक आबासाहेब मस्कर, नगरसेवक शमशाद मुजावर, नगरसेवक सुनीता वीर, नगरसेवक सुरेखा काळे, नगरसेवक पवार चंद्रकला, नगरसेवक शीतल गाडे, नगरसेवक माणियार नुरजहाँ महंमद ईसाक, नगरसेवक रीमा शिंदे, नगरसेवक नाईकवाडी मंगल, माने भाग्यश्री , नगरसेवक तौफिक कुरेशी, नगरसेवक शेटे अभिजित आदी उपस्थित होते. एकूणच, प्रशासक काळातील खर्चाच्या चौकशीच्या मागणीमुळे भूम नगर परिषदची अर्थसंकल्पीय सभा चांगलीच वादळी ठरली.
