धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडून दोन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटला असला तरी सत्ता स्थापनेची प्रक्रिया रखडलेली होती. ग्रामविकास विभागाकडून आवश्यक पत्र प्राप्त न झाल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकला नव्हता. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र अखेर आज बुधवार (दि.25) रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून संबंधित पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या पत्रानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष व सभापती निवडीसाठी आवश्यक बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, या सर्व पहिल्या बैठका 20 मार्च 2026 पूर्वी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम 11(1) आणि कलम 59(1) नुसार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे अध्यक्ष आणि सभापती निवडीसाठी ही पहिली बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

दरम्यान, धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये अध्यक्षपदासाठी अंतर्गत स्पर्धा वाढल्याचे चित्र असले तरी भाजपने 32 जी प सदस्य आपल्या गटात घेऊन आपली बाजू मजबूत केली आहे अध्यक्ष पदाला बहुमतासाठी 28 मतांची गरज आहे

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याने महायुतीतील अंतर्गत सत्ता संघर्ष मिटतो की अधिक तीव्र होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top