धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 13 डिसेंबर, 2025 रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीत जिल्ह्यात हजारो प्रकरणे तडजोडीने निकाली निघाले आहेत.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.आवटे, एस. जी.दुबे (जिल्हा न्यायाधीश 4), आर. के. खोमणे (जिल्हा न्यायाधीश 5), अमोल वरुडकर (अध्यक्ष,जिल्हा विधीज्ञ मंडळ), एम.बी.देशमुख (जिल्हा शासकीय अभियोक्ता), बी.के.पाटील (सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) तसेच इतर न्यायाधीश उपस्थित होते. या लोक अदालतीसाठी एकूण 9 पॅनल ठेवण्यात आले होते.
13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील लोक अदालतीमध्ये एकूण 55 हजार 427 प्रलंबित व दावापूर्व 12 हजार 380 प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित एकूण 753 व दावापूर्व एकूण 3,577 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली आहे. लोक अदालतीमध्ये धनादेश प्रकरणांमध्ये फिर्यादी पक्षाला रुपये 1 कोटी 10 लक्ष 27 हजार 977 रुपये इतकी वसुली झाली.प्रलंबित दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांतून 1 कोटी 62 लक्ष 21 हजार 690 रुपये इतकी रक्कम वसूल झाली.बँकेच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये रुपये 1 कोटी 13 लक्ष 43 हजार 320 रुपये तर बँकेच्या वादपूर्व प्रकरणांमध्ये रुपये 95 लक्ष 83 हजार 570 रुपये इतकी वसुली झाली. तसेच नगरपालिक व ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी व घरपट्टीच्या प्रकरणांमधून रुपये 87 लक्ष 76 हजार 618 हजार इतकी वसुली झाली. ग्राहक मंचाच्या प्रकरणांमध्ये रुपये 15 लक्ष इतकी रक्कम वसूल झाली. तर गुन्हा कबुलीच्या प्रकरणांमध्ये रुपये 3 लाख 92 हजार इतका दंड वसूल करण्यात आला.