धाराशिव (प्रतिनिधी)-  देशाची सुरक्षितता ही सैनिकांच्या हाती आहे. सैनिक हे देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करत असतात.कुटुंबासाठी कमी आणि देशासाठी जास्त वेळ देत असतात. त्यामुळे देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे आद्य कर्तव्य आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन समिती सभागृह येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पुजार बोलत होते. यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, पोलीस उपाधीक्षक (गृह) डी.पी.पारेकर, जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना नरवडे, एसटीचे विभाग नियंत्रक अजय पाटील व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल शरद पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ज्योती पाटील, न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांचेही भाषण झाले. वीर पत्नी प्रभावती निकम, रहना बेगम, संगीता सावंत, लक्ष्मीबाई गायकवाड, कांताबाई कदम, वीरमाता माताबाई नागरगोजे, वीर बंधू दिलीप बनसोडे व शिवाजी कोळपे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक अश्विनी जाधव,अधिकार मित्र अशोक गाडेकर,सैनिक कल्याण विभागाचे गुरुनाथ कुलकर्णी, अनिल मलशेट्टी यांच्यासह विविध विभागाचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक पाल्य ज्ञानेश्वर मोरे याला 20 हजार रुपयांचा धनादेश, दहावीमध्ये उत्तम गुण प्राप्त केल्याबद्दल आर्या कुलकर्णी,आदित्य वाघ याला एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल 75 हजार रुपयांचा धनादेश व आर्मी ट्रेनिंग गया येथे निवड झाल्याबद्दल हरिकेश गाडेकर यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार विशाल सूर्यवंशी यांनी मानले.कार्यक्रमाला वीर पत्नी, वीर माता,माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय,एन.एन.सीचे विद्यार्थी तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top