धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये आणि दोन नगर पंचायतींमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार नामांकन अर्ज १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत दाखल करता येतील.

अर्जांची छाननी १८ नोव्हेंबरला होईल, तर अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २ डिसेंबर रोजी मतदान होईल, आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडेल. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना आता तयारीसाठी अवघे २५ दिवस मिळाले आहेत. या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. 

नव्या नियमानुसार —

‘अ’ वर्ग नगरपालिका: नगराध्यक्ष – १५ लाख, नगरसेवक – ५ लाख

‘ब’ वर्ग नगरपालिका: नगराध्यक्ष – ११.२५ लाख, नगरसेवक – ३.५० लाख

‘क’ वर्ग नगरपालिका: नगराध्यक्ष – ७.५० लाख, नगरसेवक – २.५० लाख खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रनिहाय मतदार यादी ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतरच उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी प्रत्यक्ष सुरू होईल. विविध पक्षांचे संभाव्य उमेदवार जनसंपर्क वाढवण्याच्या हालचाली वेगाने करत असून, नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची चढाओढ सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील सर्वच नगरांमध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार लढत अपेक्षित आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top