कळंब (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी विकासाला प्राधान्य देत कळंब नगरपरिषद निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे भारतीय जनता पार्टी तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कळंब शहरातील मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक सोयींसाठी विविध विकासकामांचा पाठपुरावा सुरू असून, या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.

भाजप कळंब शहरच्या वतीने मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून अनेक लोकाभिमुख कामे मंजूर झाली आहेत आणि काही कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये मांजरा नदीकाठावरील मोठा महादेव घाटाचा विकास करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी प्रत्येक प्रभागात 2 RO plant बोअर सहित तसेच प्रत्येक प्रभाग व बाजारपेठे जवळ स्वच्छ शौचालये प्रस्तावित केली आहेत. 

रामेश्वर महादेव मंदिर, शास्त्री नगर, बाबा नगर परिसर सुशोभीकरण, सावरगाव हनुमान मंदिर आणि पुनर्वसन क्षेत्राचा विकास, श्री देवी मंदिर परिसरातील गोंधळी ओटा बांधकाम, तसेच बाबा नगर सर्वे क्र. 107 मधील जागेत बालोद्यान व ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान उभारणी यांचा समावेश आहे. भीम नगरकडे जाणाऱ्या मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार कमान, स्व. सावरकर चौक, देवी रोड येथे श्री देवी मंदिर प्रवेशद्वार कमान यासह 5 कोटी रुपयांचे कामे प्रस्तावित असून लवकरच मार्गी लागणार आहेत.

याशिवाय खेळाडूंसाठी आवश्यक क्रीडा साहित्य आणि सुविधा पुरविणे, भीमनगर आणि साठे नगर येथे अभ्यासिका सुरू करणे, तसेच नळ, गटार, रस्ते आणि सार्वजनिक प्रकाशव्यवस्था या मूलभूत सोयी गुणवत्तापूर्ण व्हाव्यात यासाठी पाठपुरावा केला जात आहे.भाजप कळंब शहर तालुका अध्यक्ष मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी पक्षाने महायुती म्हणून लढण्याची मानसिकता ठेवली आहे.  अधिकृत उमेदवार आणि महायुतीचा निर्णय हे वरिष्ठ नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी हे ठरवणार आहेत. तरी याबाबत कुणीही संभ्रम बाळगू नये तसेच निर्माण करू नये. पत्रकार परिषदेत सतपाल बनसोडे, प्रशांत लोमटे, सरचिटणीस परशुराम देशमाने, उपाध्यक्ष संतोष भांडे, संजय घोगरे, किशोर वाघमारे, विकास कदम, हर्षद अंबुरे आणि माणिक बोंदर आदी उपस्थित होते.

 
Top