धाराशिव (प्रतिनिधी)- रब्बी पेरणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अतिरिक्त मदतीचा शासन आदेश मंगळवारी निर्गमित झाला आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तब्बल 577 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी 189 कोटी, सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे 292 कोटी आणि खरवडून गेलेल्या जमिनीचे 40 कोटी असे एकूण 521 कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने मंजूर केले आहेत. काल जाहीर मंजूर झालेले 577 कोटी आणि पूर्वीचे 521 कोटी असे एकूण 1,098 कोटी रुपयांचे अभुतपुर्व अनुदान जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. या अभुतपूर्व मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यांचे मनःपूर्वक आभार मानले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेले नुकसान अभूतपूर्व आहे त्यामुळे मदतही अभूतपूर्वच असायला हवी. अशी आग्रही मागणी आपण अगदी पहिल्या दिवसापासून लावून धरली होती. त्याचा सलग पाठपुरावाही केली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जवळपास सर्वच मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी अत्यंत संवेदनशीलपणे निर्णय घेतला. सुरूवातीला ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांना दिलासा 189 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची व्याप्ती मोठी होती. त्यापोटी तब्बल 292 कोटी 49 लाख रुपये आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले. ज्या ठिकाणी जमीन खरवडून गेली, विहिरींचे नुकसान झाले त्या ठिकाणीही भरीव मदत करणे आवश्यक असल्याचे ध्यानात घेत 40 कोटी 48 लाख रुपये मंजूर करण्यात आले. रब्बी हंगामात पेरणीसाठी बी-बियाणे, खत यासाठी तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 10 हजार रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली होती. त्याचा शासन आदेश मंगळवारी निर्गमित झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी तब्बल 577 कोटी रुपयांची भरीव मदत आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मंजूर केली आहेत. नुकसानीची व्याप्ती मोठी आहे.त्यामुळे जास्त नुकसान झालेले शेतकरी व खरडून गेलेल्या जमिनीसाठी अधिकची मदत मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरूच आहेत. आजवर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तब्बल 1098 कोटी रुपयांचे अभुतपुर्व अनुदान मंजूर झाले आहे. याव्यतिरिक्त बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही अनुदान मिळावे याकरिता आपण आग्रही प्रयत्न करीत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात जून महिन्यापासूनच पावसाने गोंधळ घातला. जून महिन्यात 266 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे तब्बल दोन लाख 34 हजार 955 शेतकऱ्यांच्या वाट्याला नुकसान आले. जुलै-ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात पावसाने सर्वाधिक गोंधळ घातला. त्यामुळे चार लाख चार हजार 656 शेतकऱ्यांच्या शेती आणि पिकांचे नुकसान झाले. जून ते सप्टेंबरपर्यंत झालेल्या एकूण नुकसानीपोटी आत्तापर्यंत एकूण सहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी तब्बल 1,098 कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आत्तापर्यंत पावणेतीनशे कोटींची मदत वितरीतही करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना मदत वितरीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठीही हजार कोटी
जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गासाठी 3,295 कोटी रुपयांच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यत बहाल करण्यात आली आहे. राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के हिस्सादेखील देण्यास आपल्या महायुती सरकारने मंजुरी दिली आहे. ठाकरे सरकारने त्याच वेळी राज्याच्या वाट्याचा पन्नास हिस्सा दिला असता तर कदाचित आत्तापर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्णही झाला असता. ठाकरे सरकारने राज्यहिस्सा निधी न दिल्यामुळेच प्रकल्प किंमत 904.92 कोटी वरून 3,295 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिल्याबद्दल तसेच आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर यावे याकरिता राज्याच्या तिजोरीतून हजार कोटीहून अधिक रुपयांचा वाटा उचलल्याबद्दल सबंध धाराशिवरांच्या वतीने कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
