धाराशिव (प्रतिनिधी)- तब्बल शंभर किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून आपण धाराशिव शहरासाठी पाणी आणले. अशक्यप्राय वाटणारी योजना आपण पूर्ण केली. मात्र उबाठा गटाला त्याचे साधे नियोजनही करता आले नाही. येत्या काळात धाराशिव शहराला 24 तास मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे. हे केवळ स्वप्न नाही तर उजनी पाणीपुरवठा योजना ज्यापद्धतीने आपण यशस्वी करून दाखवली अगदी त्याप्रमाणेच ही कामसुद्धा आपण करणारच अशी जाहीर ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयी जल्लोष साजरा केला. महापुरुषांना अभिवादन करून एकमेकांना मिठाई वाटून, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणांच्या निनादात सर्वांनी हा आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकारी बांधवांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मार्गदर्शन केले.
बिहारच्या जनतेने विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत एनडीएला अपेक्षेपेक्षा मोठे, अभूतपूर्व आणि ऐतिहासिक बहुमत दिले आहे. या विजयाने राष्ट्रीय पातळीवरील विकासमार्ग अधिक भक्कम झाला आहे. बिहार राज्यातील सर्वसामान्य सामान्य नागरिकांचा भारतीय जनता पक्षावर असलेला दृढ विश्वास या निकालातून ठळकपणे अधोरेखित झाला आहे. मध्यंतरी पालिकेत सत्तेत असलेल्या ठाकरे गटाने शहराचे अक्षरशः वाटोळे केले आहे. त्या सगळ्या अडचणींवर मात करून आपण सर्वांनी कामाला लागावे असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केले. यावेळी दत्ता कुलकर्णी, सुरेश देशमुख, नितीन काळे, नेताजी पाटील, अनिल काळे, अमित शिंदे, नितीन भोसले, सुनील काकडे, अभय इंगळे, युवराज नळे, प्रीतीताई कदम, अंजली बेताळे, विद्या माने, अभिजित काकडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
