भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपला डाव साधत तीन ठिकाणी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. शासकीय विश्रामगृहासमोर असलेल्या दोन दुकानांमध्ये तसेच एका घरात चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाकडे रात्रगस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

अधिक माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. 29 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी परंडा रोड व पारडी रोडवरील दुकान व घरात प्रवेश करून अंदाजे 50 ते 60,000 रोख रक्कम, गळ्यातील एक तोळ्याचे गंठण आणि कानातील दहा ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण मुद्देमाल लंपास केला.

याचदरम्यान, कळभैरव मशिनरी स्टोअर्स तसेच परांडा रोड फ्लोरा चौकातील दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. प्राथमिक तपासात चोरट्यांनी दुकानातील दोन पाण्याच्या मोटारी लंपास केल्याचे समोर आले आहे. शहरातील व्यापारी व नागरिक वर्गामध्ये या चोरीच्या घटनांमुळे मोठी अस्वस्थता पसरली आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची आणि रात्रगस्त वाढवण्याची मागणी केली आहे. व्यापारी संघटनेनेही पूर्वीच या भागात गस्त वाढवावी, अशी सूचना दिल्याचे समजते.

मागील आठवड्यातच दूध संघ कार्यालयाच्या मागील बाजूस चोरी झाल्यानंतर पुन्हा याच परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चोरीची माहिती मिळताच भूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून, ठसे तज्ञांची टीम धाराशिवहून पाचारण करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.पुढील तपास पोलीस प्रशासनाने सुरू केला आहे.

 
Top