धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील बारा बलुतेदारांना अवजारे व साधनांचा वापर करून तसेच हाताने काम करणाऱ्या पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांच्या विकासासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केला आहे,अशा सर्व लाभार्थ्यांसाठी व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून देण्यात येणारे कर्ज,उद्योग केंद्राकडून देण्यात येणारे टुलकिट व इतर बाबींशी निगडित अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी सूक्ष्म,लघु व मध्यम उद्यम मंत्रालय (एमएसएमई) विकास कार्यालय,छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळ,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेच्या वेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक महादेव बळे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महादेवी रणदिवे,सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक संचालक राहुल मिश्रा,तसेच मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर टपाल कार्यालयाकडून टूलकिट मिळाले किंवा नाही,या योजनेतून ज्या लाभार्थ्यांना बँकेने कर्ज मंजूर करून वाटप केले आहे,तसेच ज्या लाभार्थ्यांना फक्त कर्ज मंजूर केले परंतु वाटप केले नाही,कर्जाचे प्रस्ताव नामंजूर केले गेले किंवा असे प्रस्ताव दुसऱ्या बँकेस पाठविण्यासाठी येणाऱ्या अडचणी अशा विविध बाबींचे निराकरण करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.तसेच विविध मान्यवरांनी यावेळी या योजनेच्या लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अजयसिंह पाटील, उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी पांडूरंग मोरे,तसेच या योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top