मुरूम ( प्रतिनिधी) -  केसरजवळगा, ता. उमरगा येथील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील सहा शिक्षकांची बदली झाल्याने सर्वच विद्यार्थ्यांनी ओक्साबोक्शी रडताना पाहून गावाला गहिवरून आले. शिक्षकांच्या आँनलाईन बदलीचा आदेश सोमवारी (ता. ८) रोजी धडकताच मंगळवारी जिल्ह्यातील सर्वच शाळातील कमीअधिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या शाळेत गेल्या सात वर्षाच्या काळात सर्वच शिक्षकांनी केलेला कायापालट व गुणवत्तेसाठी केलेली धडपड यातून एक चांगली टीम बनली होती. यात सहशिक्षक संजय चव्हाण, युसुफ गवंडी, श्रीकांत कनकधर, कल्पना क्षीरसागर, अनंतकुमार गुरनाळे व देविदास काळे या़ंची बदली झल्याने सर्वच विद्यार्थी धाय मोकलून रडत होते. यावेळी व्हिडिओ काँलवरून शिक्षकांशी बोलताना विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा व शिक्षकांच्या अश्रूंचा बांध फुटला. सर्वच शिक्षक व विद्यार्थी रडताना पाहून शिक्षक व विद्यार्थी यांच्यात तयार झालेल्या नात्यात बदलीने तडा गेल्याने मुले-मुली रडत होती. पहिलीला शिकविणारे संजय चव्हाण सर न आल्याने माझ्या सरांची गाडी का नाही, असे प्रश्न विचारून अनेक मुले रडत होती. संजय चव्हाण, देविदास काळे व अनंतकुमार गुरनाळे यांच्या आठवणी सांगून अनेक मुले रडत होती. यावेळी गावातील शिक्षक युसुफ गवंडी, श्रीकांत जवळेकर व शाळेतील उपस्थित शिक्षक बालाजी भोसले यांच्या गळ्यात पडून सर्वच शिक्षकांच्या आठवणीत मुले रडत होती. या शाळेत बारा पदे मान्य होती पण प्रशासनाने शिक्षक न दिल्याने पालकांनी टी. सी. काढल्याने आता दहाच पदे शिल्लक आहेत. यापैकी बदलीत दोनच शिक्षक आल्याने एकूण दहापैकी सहा जागा आणखी रिक्त आहेत. अडीचशेच्या जवळ पटसंख्या असताना शिक्षकसंख्या नसल्याने पट कमी होतोय, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरवू असा इशारा यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिला आहे.      

 
Top