धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात अभूतपूर्व अशी अतिवृष्टी झाली आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे सणासुदीचे दिवस असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना राबवून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी 'मित्र'चे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.

धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्ये 21 महसूल मंडळांत तर सप्टेंबरमध्ये 7 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. उर्वरित मंडळांत सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अद्यापही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी जीवितहानी झाली असून जनावरेही दगावली आहेत. अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगामातील ही आणीबाणीची परिस्थिती पाहता नैसर्गिक आपत्तीच्या या काळात विशेष उपाययोजना राबवून मदत जाहीर करावी, पंचनामे तातडीने पूर्ण करून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी पत्रात करण्यात आली आहे.

 
Top