धाराशिव (प्रतिनिधी)- अतिवृष्टीने जिल्ह्यात  शेतकरी, पशुपालक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत.त्याप्रमाणे कार्यवाही सुरूच आहे. या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना, पशुपालकांना शासन मदत मिळेल. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांना दिली.

धाराशिव तालुक्यातील वडगाव (सिद्धेश्वर) येथे नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी भर पावसात  पालकमंत्री सरनाईक यांनी आज केली. यावेळी ते बोलत होते. वडगाव (सि.) येथील शेतकरी भुजंग जानराव यांनी लावलेल्या दोन एकर सोयाबीन पिकांची पाहणी पालकमंत्री सरनाईक यांनी केली व जानराव यांची व्यथा त्यांच्या बांधावर जात जाणून घेतली. यावेळी गजेंद्र जाधव यांनीही परिसरातील पिकांच्या नुकसानीची माहिती पालकमंत्री सरनाईक यांना दिली.

पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महादेव आसलकर, तलाठी माधव कदम, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यासंबंधी नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रस्ताव देखील शासनास सादर केला आहे. परंतु त्यानंतरही अतिवृष्टी, पावसाने शेतकरी, पशुपालक यांचे नुकसान झालेले आहे, त्याबाबतचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरूच आहे. ही कार्यवाही पूर्ण होताच शासनास प्रस्ताव सादर करण्यात येईल. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत मिळेल, असे पालकमंत्री सरनाईक यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले.

 
Top