धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील कांही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उर्वरित काही मंडळांत सरासरीपेक्षा 50% अधिक पाऊस झाला आहे. मदतीसाठीच्या निकषात हे बसत नसले तरी वस्तुनिष्ठ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठवावेत, शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

धाराशिव जिल्ह्याच्या अनेक भागांत शनिवारी रात्री पासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे तर मोठे नुकसान झालेच. शिवाय, पुराचे पाणी घुसल्यामुळे अनेक गावांतील घरांचे नुकसान झाले. शेती बांध फुटून माती वाहून गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवारी दिवसभर अनेक गावांना भेट देऊन पाहणी केली. नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार पाटील यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील कांही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.उर्वरित मंडळ  हे मदतीच्या निकषात बसत नाहीत, मात्र पिकाचे 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या  गावांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवावेत, मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार, अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांकडे आपले लक्ष असून. अशा गावांतील नुकसानीचे पंचनामे लवकर व्हावेत, असा प्रयत्न आहे. प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.


ऑगस्टमधील मदत 15 दिवसात अपेक्षित

जिल्ह्यात ऑगस्टमध्येही पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते.याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांची बैठक घेऊन त्यांना तातडीने प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते त्याला अनुसरून तपशीलवार यादी प्रशासनाने तयार केली आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडून विभागीय आयुक्तांमार्फत ही यादी मंत्रालयात पाठवली जाईल. मंत्रालयात त्याबाबत अंतिम निर्णय होईल. राज्यातील काही जिल्ह्यांत नुकसानभरपाई दिली जात आहे. येत्या 15 दिवसात  आपल्या जिल्ह्यातही पहिल्या टप्प्याचा निधी येणे अपेक्षित आहे. यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

 
Top