धाराशिव, ( प्रतिनीधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्या इतकाच हैदराबाद मुक्ती संग्राम लढा महत्त्वाचा आहे. या लढ्यामध्ये शेकापचे भाई उद्धवराव पाटील, भाई नरसिंहराव देशमुख, भाई जे.डी. बापू लाड, आण्णासाहेब गव्हाणे यांनी बार्शी तालुक्यातील इर्ले, शेंद्री, धाराशिव तालुक्यातील पिंपरी, बीड जिल्ह्यातील फुलतांबे अशा अनेक ठिकाणी रजाकराशी सशस्त्र लढा दिला, बॉम्ब ॲटक, गोळीबार केला, लोकांना संघटित करून स्वातंत्र्य लढा उभा केला. इतिहासात लढणारे स्वांतत्र्य सैनिक यांना लिहायचे माहित नव्हते मात्र श्रेय घेणारे यांना लिहायची माहीत होते. त्यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात प्रत्यक्ष लढणाऱ्याचा इतिहास उपेक्षित राहिला आहे असे विचार ब्रिटिशांच्या विरोधात प्रतिसरकार चालवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड. सुभाष पाटील यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव आयोजित छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे भाई उद्धवराव पाटील सभागृह येथे कार्यक्रम प्रसंगी ॲड. सुभाष पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे होत्या. प्रसंगी उपाध्यक्ष ॲड.अविनाशराव देशमुख, कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांची नात सून सत्यभामा पाटील, शकुंतला पवार, इंद्रजीत पाटील, प्राचार्य विक्रमसिंह देशमुख, उपप्राचार्य बालाजी कुंभार, पर्यवेक्षक अमोल दीक्षित,आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक कचरू घोडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल, क्रांतिसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, भाई नरसिंहराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करत अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व १९४२ मध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रतिसरकार सुरू केले होते. मराठवाड्यात तुफान सेनेच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करून बौद्धिक, लाठीकाठी, सशस्त्र प्रशिक्षण दिले जात होते. या तरुणांना शस्त्र, बंदुका व दारुगोळा अशी रसद पोहोचविण्याचे काम पत्री सरकारच्या चळवळीतून होत होते. हैदराबादचा निजाम जगातील श्रीमंतांच्या पैकी एक होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संस्थानिकांचे स्वहित, अमानुष अत्याचार, रजाकराची जुलमी राजवट पाहता भारतीय स्वातंत्र्य लढ्या बरोबरच हैदराबाद स्वातंत्र्य लढा देखील तितकाच महत्त्वाचा आहे असे विचार ॲड. सुभाष पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
तर राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत सर्वसामान्य कष्टकरी माणसाच्या मुलांच्या शिक्षणासाठी योगदान देत असल्याचे अध्यक्षीय मनोगतातून शशिकलाताई घोगरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवी सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक आण्णासाहेब कुरुलकर यांनी व आभार प्रा. राहुल पाटील यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वृंद उपस्थित होते.