धाराशिव, ( प्रतिनीधी)- जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे.धाराशिव येथील स्त्री रूग्णालयात रक्त साठवण केंद्र व जेनेटिकचा लाभ जिल्ह्यासह, नजिकचे जिल्हे व एकूणच मराठवाड्यातील नागरिकांना होणार आहे.या रक्त साठवण केंद्र आणि जेनेटिक लॅबमुळे गरोदर माता, नवजात बालकांचे लवकर रोगनिदान होऊन योग्य उपचार मिळण्यास मदत होईल,असा विश्वास परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.देशातील सातवा व राज्यातील पहिला हा डीबीटी उम्मीद प्रकल्प धाराशिव येथे कार्यान्वित झाला आहे.याबद्दल त्यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे कौतुकही केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयांतर्गत स्त्री रूग्णालयात रक्त साठवण केंद्र आणि डीबीटी उम्मीद प्रकल्पांतर्गत जेनेटिक लॅबचे पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले.यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान, शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या डॉ. वीणा पाटील,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे-गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
थॅलेसिमिया,सिकलसेल,इतर अनुषंगिक आजार व गर्भावस्थेतील उच्च जोखमीच्या तपासण्या जेनेटिक लॅबमध्येच करणे शक्य आहे.या लॅबमुळे आजाराचे वेळेवर निदान, सल्ला व उपचार मिळण्याची सुविधा या लॅबमुळे होणार आहे.रूग्णांना याचा मोठ्याप्रमाणात लाभ होणार आहे.तर रक्त साठवण केंद्रामुळे प्रसूतिसंबंधी व आपत्कालिन शस्त्रक्रियांमध्ये रक्ताची उपलब्धता वाढण्यासाठी मदत होणार आहे. तसेच माता,शिशू मृत्यू दर कमी होण्यास मदत होणार आहे.स्थानिक स्तरावर सुरक्षित व त्वरित रक्तपुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री सरनाईक म्हणाले. "स्वस्थ नारी सशक्त परिवार" अभियान यशस्वीपणे राबवण्याबाबतही त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती डॉ. गवळी यांनी केले.धाराशिव जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा असल्यामुळे केंद्र सरकार व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने डीबीटी उम्मीद हा प्रकल्प स्त्री रुग्णालय येथे सुरु करण्यात येत आहे.हा महत्वकांक्षी प्रकल्प भारत देशातील सातवा व महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असल्याचेही डॉ. गवळी म्हणाल्या.
"स्वस्थ नारी-सशक्त परिवार" अभियानांतर्गत 300 महिलांची तपासणी
स्त्री रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत तीनशे महिला रूग्णांची शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील विविध विषयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली व औषधोपचार दिले.तसेच प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्मान भारत कार्डचे वाटपही पालकमंत्री यांचे करण्यात आले.स्त्री रुग्णालयात रक्तदान शिबिरही पार पडले.आरोग्य कर्मचा-यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात क्षयरोग मित्रांना यावेळी टीबी कीटचे वाटप करण्यात आले.