तुळजापूर (प्रतिनिधी)- सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदाच्या खरीप हंगामावर अक्षरशः पाणी फिरले असून, मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, मूग, उडीद, तूर, मका, कापूस व ज्वारीसारखी पिकं जलमय झाली आहेत.
पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आयुष्यच उध्वस्त केले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पिके जमिनीत गाडली गेल्याने खरीप हंगाम ‘अंधारात' गेला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आमदार रणजगजितसिंह पाटील यांनी पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी साकडे घातले आहे.
ऑगस्टमध्ये 29 महसूल मंडळांत तर सप्टेंबरमध्ये 7 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याची अधिकृत नोंद आहे. उर्वरित मंडळांमध्येही 50 टक्क्यांपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली आहेत. परिस्थिती एवढी गंभीर की, हजारो शेतकरी बुडीत अवस्थेत घर चालवायचं कसं, कर्ज फेडायचं कसं, या चिंतेत आहे.