वाशी (प्रतिनिधी)-  तालुक्यातील पारगाव-जानकापुर रस्त्यावरील अपूर्ण कामे आणि मांजरा नदीवरील पुलावर संरक्षक कठडे नसल्याने ग्रामस्थांनी आज जलसमाधी आंदोलन पुकारले. आपल्या गावाच्या हक्कासाठी जीव धोक्यात घालण्याची ग्रामस्थांची ही वेळ येणे, हे प्रशासनासाठी धक्कादायक चित्र ठरले. आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर संध्याकाळी तहसीलदार यांनी गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. 

आंदोलन ठिकाणी पोलीस निरीक्षक संग्राम थोरात, उपअभियंता पैकराव, नायब तहसीलदार किसन सांगळे, मंडळ अधिकारी सचिन पवार, ग्राम महसूल अधिकारी किशोर देशमुख यांनी ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावेळी संध्याकाळी तहसीलदार प्रकाश म्हेत्रे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या वेदना समजून घेतल्या आणि प्रामाणिक आश्वासन दिले. त्यांच्या शब्दांतील आत्मीयता पाहून ग्रामस्थांचे मन पाघळले आणि आंदोलन स्थगित करण्यात आले.


अटींवर आंदोलन मागे 

जिल्हाधिकारी यांना बुधवारी भेटून  बैठकीत हा मुद्दा प्राधान्याने मांडणे. पारगाव, जानकापुर रस्त्यावरील किरकोळ कामे तात्काळ सुरू करणे. मांजरा नदीवरील पुलावर संरक्षक कठडे लवकरात लवकर बसवणे. या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या असल्याचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.

 
Top