मुरुम( प्रतिनिधी)- लातूर येथील अंनिस राज्य कार्यकारिणी बैठकीत सुधारककार आगरकर पुरस्कार मुंबई येथील पीपल सायन्स नेटवर्क इंडियाचे समन्वयक डॉ. विवेक मोन्टेरो (मुंबई) यांना, तर सुधाकर आठल्ये पुरस्कार अंबेजोगाई येथील प्राचार्य डी.एच. थोरात (अंबाजोगाई) यांना देण्यात आला. देवयानी भगत (नागपूर) यांना सावित्रीमाई फुले पुरस्कार सुनिता भोसले (शिरूर) यांना भटक्या विमुक्त जमाती प्रबोधन पुरस्कार,  कमलाकर जमदडे (बिलोली, नांदेड) यांना सुधाकर आठले युवा कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये दहा हजार आणि मानपत्र असे आहे. यावेळी अंनिस ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले आणि लातूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश देवशेटवार, शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.एन.शिंदे या सर्वांनी पुरस्कार प्रदान केले. 


डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन देशभर 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' म्हणून साजरा करण्यासाठी मोलाचे सहकार्य डॉ. माँटेरो यांनी केले आहे. डॉ माँटेरो यांनी आजच्या जगातील समस्या यांना वैज्ञानिक दृष्टीकोनाने विश्लेषण करण्याची गरज बोलून दाखवली. ते पुढे म्हणाले, "देशातील वैज्ञानिक विषयांबद्दलची स्थितीची उकल ही सामाजिक, राजकीय अंगाने तसेच वैज्ञानिक पद्धतीने विचार केल्याशिवाय होणार नाही. वैज्ञानिक पद्धत, वैज्ञानिक दृष्टिकोन, गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षण हे आर्थिक राजकीय समानता व न्याय मिळवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. याचे प्रशिक्षण, याबद्दल जागरूकता वाढायला हवी यावर त्यांनी भर दिला. *प्रश्न विचारणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे हे काम करणारे खरे देशभक्त आहेत. त्यामुळे ते आपण करत राहिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे."

भटक्या-विमुक्त जाती- जमातीतील अघोरी प्रथा, चाली-रीती याविषयी प्रबोधनकार्य करणाऱ्या सुनीता भोसले यांनी समाजाने भटक्या विमुक्त समाजाला अजूज स्वीकारले नाही ही खंत बोलून दाखवली. अंनिस तर्फे मिळालेला असा पुरस्कार हा आमच्या पारधी समाजातील मिळालेली मी पहिली व्यक्ती आहे ही समाधानाची भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली. भटक्या विमुक्त जमातीतील लोकांच्या समस्यांवर न्याय मिळण्यासाठी अंनिस व इतर सामाजिक संघटनांनी काम करण्याची गरज आहे असे आवाहन त्यांनी केले. 

याचबरोबर अंनिस ने सुरू केलेल्या ग्रंथमित्र, आधारस्तंभ आणि शतकवीर हे ७५ पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रतर्फे दिले गेले. 

मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्तविक केले.फारुक गवंडी यांनी सूत्रसंचालन केले. अंनिस राज्य कार्यकारी समितीचे सदस्य मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, प्रवीण देशमुख, डॉ. अशोक कदम, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, अण्णा कडलसकर, मुंजाजी कांबळे, रामभाऊ डोंगरे, निळकंठ जिरगे, प्रकाश घादगिने हे यावेळी उपस्थित होते. रमेश माने यांनी आभार व्यक्त केले.

 
Top