धाराशिव (प्रतिनिधी)- स्वर्गीय सहकार महर्षी राजारामबापू पाटील, श्रीमती स्वर्गीय पाटील व आमदार जयंतराव पाटील यांच्या बाबतीत समाज माध्यमाद्वारे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाजपा पक्षाचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून यापुढे महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी ठणकावून सांगत इशारा दिला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी द्वेषानी पछाडून स्वर्गीय लोकनेते राजारामबापू व त्यांच्या कुटुंबाविषयी जर सातत्याने यापुढे ही भाषा वापरली तर त्याच पद्धतीने त्यांना उत्तरे दिली जातील, महाराष्ट्राच्या संस्कृत राजकारणाची परंपरा आमदार पडळकर यांचेसारखे वाचाळवीर मोडत असून त्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळीच आवर घालावी, अन्यथा याचे दुष्परिणाम भाजपाला भोगावे लागतील. महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही असा इशारा देत आमदार पडळकर यांच्या निषेध संजय पाटील दुधगावकर यांनी केला.