लातूर (प्रतिनिधी)- महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांमधील रिक्त असलेली अतांत्रिक अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरावीत, अशी मागणी एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनने तिन्ही कंपन्यांच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. 

प्रदीर्घ काळापासून महावितरण कंपनीत वेतनगट 1 व 2 मधील विधी, सुरक्षा व अंमलबजावणी, माहिती तंत्रज्ञान, वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, जनसंपर्क या संवर्गातील सरळसेवा/अंतर्गत प्रक्रियेद्वारे भरण्यात येणारी पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्याबाबत महावितरणचे संचालक (मासं) राजेंद्र पवार यांची असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी (दि.11 सप्टेंबर) प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. अतांत्रिक संवर्गाची पदे जवळपास मागील 10 वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत, ही बाब असोसिएशनचे सरचिटणीस संजय खाडे यांनी संचालक (मासं) राजेंद्र पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. सदर प्रकरणी लवकरच योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. 

यासह सांघिक कार्यालय स्तरावरील अतांत्रिक संवर्गातील दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेले पदोन्नती पॅनल लवकरात लवकर घेण्याची तसेच प्रतीक्षा यादीत असलेल्या अधिकाऱ्यांचे 30 सप्टेंबरपूर्वी पदोन्नती आदेश निर्गमित करण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी केली. याशिवाय पुणे येथील वाढती वीजग्राहक संख्या लक्षात घेता माहिती तंत्रज्ञान विभागाकरिता नव्याने रास्ता पेठ, पुणे येथे सॉफ्टवेअर सेलची निर्मिती करण्याची विनंती करण्यात आली. यासह अनेक प्रलंबित प्रश्नांचे निवेदन संघटनेच्या वतीने संचालक (मासं) यांना देण्यात आले. याच धर्तीवर महापारेषण व महानिर्मिती कंपनीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत निवेदन देण्यात आले. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश लडकत, सरचिटणीस संजय खाडे, उपसरचिटणीस प्रणेश शिरसाट, केंद्रीय कोषाध्यक्ष प्रवीण गायकवाड व केंद्रीय सल्लागार गुलाबराव मानेकर उपस्थित होते.

 
Top