तुळजापूर (प्रतिनिधी)-   महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने तुळजापूर येथे होणाऱ्या श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला आहे. सन 2025-26 या वित्तीय वर्षातील पर्यटन विभागाच्या दिनदर्शिकेत या महोत्सवाचा समावेश करण्यात आला आहे.

शासन परिपत्रकानुसार, दरवर्षी शारदीय नवरात्र काळात तुळजापूरला महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतून 50 लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहतात. या काळात तुळजापूर शहर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणाने खुलून जाते. मंदिर परिसरात दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, शास्त्रीय व लोकनृत्य यांसारखे उपक्रम आयोजित केले जातात.

पर्यटन विभागाच्या मते, या महोत्सवामुळे तुळजापूरची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक भक्कम होईल. देशभरातून येणाऱ्या भाविकांमुळे तुळजापूर हे धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र म्हणून विकसित होण्यास हातभार लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांनी पाठवलेल्या प्रस्तावास मंजुरी देत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तुळजापूरकरांना नव्या पर्यटनसंधी उपलब्ध होणार असून, स्थानिक कलाकार व व्यवसायांनाही याचा मोठा फायदा होईल.


 
Top