धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त विविध विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट सादरीकरणाच्या माध्यमातून “प्रोजेक्ट वीक “ साजरा करण्यात आला.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त अभियंता दिन साजरा केला जातो. परंतु तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी  सलग आठ दिवस विविध कौशल्यावर आधारित प्रोजेक्ट सादर करून अभिनव कल्पना राबवली. आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांनी विविध कौशल्यावर आधारित  नाविन्यपूर्ण आणि समाज उपयोगी  प्रोजेक्ट सादर करून प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन केले होते.या व्याख्यानासाठी असिस्टंट मोटर वेहिकल इन्स्पेक्टर सागर खटावकर यांना निमंत्रित केले होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वेश्वरय्या  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, अकॅडमीक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ. डी डी दाते, प्रा ए झेड पटेल ,प्रा. डी एच निंबाळकर,प्रा आर एम शेख, प्रा.दंडनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सागर खटावकर म्हणाले की, मी स्वतः देखील एक अभियंता,प्राध्यापक असताना सुद्धा स्पर्धा परीक्षेकडे वळलो. कारण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून  अधिकारी होऊन अनेक  समाजाभिमुख गोष्टी आपल्याला करता येतात.

 आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी तुमच्या घरापर्यंत क्षणात पोहोचते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क राहून कुठल्या स्पर्धा कुठल्या वेळेत होतात हे लक्षात घेतले पाहिजे. आरटीओ साठी 2017 ला झालेल्या परीक्षा आणि आज झालेल्या परीक्षा यामध्ये अमुलाग्र बदल झाला असून प्रत्येक विद्यार्थी यासाठी आता सजग झालेला आहे.  आम्ही सुद्धा आमच्या कामातून रोड सेफ्टी मध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करतो.

 ते बोलताना पुढे म्हणाले की, प्रेरणादायी भाषणे नेहमीच पेट्रोल सारखं काम करतात. ऐकल्यानंतर काही कालांतराने ती  लगेच उडून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे.  यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने बोलताना म्हणाले की, अभियंता दिन दरवर्षी साजरा होतो पण यावर्षी प्रोजेक्ट सादरीकरणांमध्ये विद्यार्थ्यांनी कमालीचा उत्साह दाखवला असून हेच प्रोजेक्ट वेगवेगळ्या स्पर्धेमधून राष्ट्रीय स्तरावर पोहोचतील. असा आम्हाला विश्वास आहे. विभागासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणारे या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी डी दाते यावेळी बोलताना म्हणाले की,  इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची वाढती मागणी आहे.परंतु पदवीसोबतच कौशल्यावर आधारित इंजिनियर्स जेव्हा तयार होतील तेव्हा त्यांना पॅकेज सुद्धा भरघोस मिळतील. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच आद्ययावत ज्ञान देऊन आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी अष्टपैलू कसा घडेल यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करतो.त्याचाच एक भाग म्हणून अभियंता दिन मोठ्या प्रमाणात यावर्षी साजरा झाला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दंडनाईक यांनी केले.  प्रा. ए आर शेख यांनी आभार मानले. व्याख्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही घेण्यात आला.

 
Top