धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगन भुजबळ यांच्या ठोस पुढाकारामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने दुग्धव्यवसाय विभागाच्या अखत्यारीतील शासकीय जमीन वसतिगृहासाठी हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे धाराशिवसह अनेक गावांमधील ओबीसी व अठरापगड समाजातील विद्यार्थ्यांना स्थायी व सुरक्षित निवासाची सुविधा मिळणार असून, त्यांच्या शिक्षणप्रवासात मोठा सकारात्मक बदल घडणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत यांनी मंत्री छगन भुजबळ साहेबांचे विशेष आभार मानले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मात्र छगन भुजबळ साहेबांनी प्रामाणिकपणे लक्ष घालून ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली, यासाठी त्यांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत. समता परिषदेच्यावतीनेही हा निर्णय ओबीसी समाजाच्या सशक्तीकरणासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. लवकरच वसतिगृहाच्या प्रत्यक्ष उभारणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही खोत यांनी सांगितले.