धाराशिव (प्रतिनिधी)-  गणेशोत्सव व त्यापाठोपाठ येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी महावितरणकडून तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत आहे. तसेच या तात्पुरत्या जोडणीच्या वीजवापरासाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेवूनच विघ्नहर्त्याचा उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणच्या अखत्यारीतील सर्व धर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजुरवठयाच्या वीज दरानेच वीजदर निश्चित केले आहेत. त्यामुळे अनधिकृत वीज जोडणी टाळून गणेश उत्सव व इतर सार्वजनिक उत्सवा करिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा. गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.


जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे आवश्यक

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे महावितरणच्या संबंधित अभियंता, लाईनमन यांचे मोबाईल नंबर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. 


 
Top