धाराशिव (प्रतिनिधी)-  शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी स्वतःच्या कुटुंबाचा, आणि स्वतःचा विचार न करता अपार कष्ट घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि आज या संस्थेचा वटवृक्ष होताना दिसतो आहे. बहुजन समाजातील मुले शिकली पाहिजेत, ज्ञानाची गंगा सर्वांच्या दारोदारी गेली पाहिजे यासाठी बापूजींनी खूप कष्ट घेतले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेऊन अभ्यास करा आणि बापूजींचे स्वप्न पूर्ण करा असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी आयोजित विद्यार्थी - पालक मेळाव्यात केले.

ते पुढे म्हणाले की,रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील वसतिगृहामध्ये अनेक दिग्गज तयार झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यापासून कुलगुरू पर्यंत त्यांनी मजल मारली आहे. आपण देखील असेच कष्ट घेऊन बापूजींचे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असे ते म्हणाले.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे आश्वासन यावेळी दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती सुशिलादेवी साळुंखे वसतिगृहाच्या अधीक्षक डॉ. स्वाती जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी केले.तर आभार दादा माळी यांनी मानले.

 
Top