धाराशिव (प्रतिनिधी)- ए आय आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी जगाशी स्पर्धा करू शकेल. सध्याचे युग हे ए आय आणि रोबोटिक्सचे असल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती होणार आहे.असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी आयोजित ए आय आणि रोबोटिक्स शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले की, सध्या केवळ संगणकावर अवलंबून न राहता ए आय आणि रोबोटिक्स याचे प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याने घेतले पाहिजे यासाठी शिक्षक सर्वप्रथम प्रशिक्षित झाला पाहिजे यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांनी हा राबवलेला उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे असे ते म्हणाले.
ए आय आणि रोबोटिक्स शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून इनेबल संस्थेच्या संस्थापक श्रीमती श्रद्धा भुरकुंडे ,आणि नेक्सस एनेबल संस्थेचे कन्सल्टंट श्री स्वानंद आठले हे लाभले होते.सदर कार्यशाळेचे आयोजन चार सत्रामध्ये केलेले होते. या कार्यशाळेसाठी मराठवाडा विभागातील गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी केले. डॉ. संदीप देशमुख म्हणाले की, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ए आय आणि रोबोटिक्स प्रशिक्षणासाठी आवश्यक तेवढे संगणक आणि आणि आवश्यक सर्व सामग्री महाविद्यालयाकडून उपलब्ध करून दिली जाईल असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैभव आगळे यांनी केले तर आभार कार्यशाळेचे समन्वयक श्री एस ए शेख यांनी मानले. सदर कार्यशाळेसाठी मराठवाडा विभागाचे गुरुदेव कार्यकर्ते आणि महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.