धाराशिव (प्रतिनिधी)- महावितरणमध्ये रिक्तपदी अनेक वर्षापासून कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जात असून ते नियमित कामगाराप्रमाणे जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु त्यांना नियमित कामगारांप्रमाणे न्याय मिळत नसल्याने जिल्ह्यातील कंत्राटी कामगार गत पाच दिवसापासून येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, अधीक्षक अभियंता संजय आडे, महेंद्र चुनारकर, व्यवस्थापक दिलीप पाटोळे यांच्यासोबत बैठक घेत कंत्राटी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्यात तीन एजन्सी कंत्राटी वीज कामगारांचे काम पाहतात. यात विद्युतसागर संस्था अंबाजोगाई, मे. आकाश इलेक्ट्रिकल बीड, मे. पटले कॉन्ट्रॅक्टर नागपूर यांचा समावेश आहे. या एजन्सीकडून कंत्राटी कामगारांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. याबाबत अधीक्षक अभियंता आडे यांना वारंवार पत्र व्यवहार करूनही एजन्सीवर अंकुश नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका कंत्राटी कामगारांनी घेतली आहे.