धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर सरकारने जानेवारी 2024 रोजी जी आश्वासन दिली त्याची अद्याप पूर्तता केलेली नाही. ही आश्वासन लवकर पूर्ण करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्यावर ते बोलत होते. 

यावेळी आमदार पाटील म्हणाले, जानेवारी 2024 ला मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईला मोर्चा काढला होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यांनी आश्वासन देऊन हा मोर्चा नवी मुंबई येथून परत पाठवला. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले की सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, हैद्राबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्यात येईल. परंतु अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. ज्या समाजाच्या लोकांना कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याकरिता जाणीवपूर्वक शासनाकडून विलंब केला जात आहे. त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या लोकांना जातवैधता प्रमाणपत्र देण्याकरीता देखील विलंब व अडथळा आणला जात आहे. मराठा समाजाचा पुन्हा एकदा आपल्या मागण्यासाठी मोर्चा 29 ऑगस्टला मुबंईला येणार आहे. त्या अगोदर सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता लवकर करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली.


 
Top