पुणे (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त यंदा प्रथमच आळंदी ते पंढरपूर अशी “अहिल्यावारी“ रथयात्रा पार पडली. या ऐतिहासिक उपक्रमास लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, या वारीला दरवर्षी नियमित स्वरूप देण्याचा संकल्प संस्थेचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी केला आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत, वारकरी भाविकांसमवेत पु. अहिल्यादेवींचा रथ आणि दिंडी मार्गक्रमण करत असतो. ही सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा जागर सतत व्हावा, या हेतूने हा उपक्रम दरवर्षी घेण्याचा निर्धार तानले यांनी व्यक्त केला.
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे नारीशक्तीचं ज्वलंत प्रतीक असून त्यांनी राष्ट्रहितासाठी केलेली सेवा आणि धर्मकार्य हे आजच्या काळात प्रेरणादायी आहे. ही प्रेरणा पंढरपूरच्या विठ्ठलभक्तांना दरवर्षी मिळावी म्हणून आम्ही ही वारी सातत्याने पुढे नेणार आहोत,“ असे तानले म्हणाले.
धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गावातील व वारी मार्गातील ग्रामस्थांचा प्रेमळ प्रतिसाद, तसेच रथाच्या स्वागतासाठी उत्स्फूर्त सहभाग, यामुळे या वारीला केवळ धार्मिक नव्हे, तर लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हा संकल्प केवळ श्रद्धेचा नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची गुढी उभारणारा एक प्रयत्न आहे, असे मत अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
हि वारी यशस्वी करण्यासाठी हभप भगवानराव गडदे महाराज, गिरीश कोळपकर,सचिन शेंडगे, भारत कोकरे, नाथा शेंबडे, प्रवीण केसकर, शिवशंकर पांढरे, ज्ञानेश्वर तानले, बिरू वाघुलकर, पांडुरंग डावकरे, सावित्रीबाई सोनटक्के, नवनाथ तानले, रुक्मिणी सोनटक्के, सुशीला भक्ते , पांडुरंग तिघाडे, दीपक दाणे, अजय गावडे, तुकाराम माने, शरद लांडगे, यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले.