धाराशिव  (प्रतिनिधी) - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने नाट्य परिषद करंडक २०२५ राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची प्रथम फेरी दि.२३ व २४ ऑगस्ट रोजी तर अंतिम फेरी दि.१५, १६, १७ आणि १८ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. दरम्यान, ही स्पर्धा फक्त मराठी भाषेतच होईल. ही स्पर्धा प्राथमिक फेरी व अंतिम फेरी असून ती हौशी नाट्य संस्था, महाविद्यालये आदींसाठी खुली असणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे व कार्यकारणी सदस्य विशाल शिंगाडे यांनी केले आहे.

खुल्या एकांकिका स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. यामध्ये रत्नागिरी (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी), पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, लातूर, धाराशिव, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, अकोला, वाशिम, यवतमाळ, सातारा, बीड, छत्रपती, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, ठाणे, नवी मुंबई, मुंबई या केंद्रावर होणार आहेत.

 तर अंतिम फेरी मुंबई येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल मनमाला टॅंक रोड, माटुंगा माहीम येथे होणार आहे.एकांकिकेची प्राथमिक फेरी वरील संभाव्य केंद्रांवर होणार आहे. परंतू प्रवेश अर्ज त्या त्या केंद्रानुसार किती प्रवेशिका येतील, त्या संख्येवर वरील केंद्र कमी अथवा जास्त करण्याचा अधिकार नाट्य परिषदेचा असेल. एखाद्या केंद्रावर नऊ पेक्षा कमी एकांकिका आल्यास नाट्य परिषद ठरवेल त्या त्या विभागातील केंद्रावर स्पर्धकांना एकांकिका सादर कराव्या लागतील याची नोंद घ्यावी. 

प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. स्पर्धेची संपूर्ण माहिती www.natyaparishad.org या संकेतस्थळावर (वेबसाईट) उपलब्ध असून तेथेच प्रवेश अर्जासोबत प्रवेश शुल्क स्विकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. (https://pages.razorpay.com/natyaparishad) प्रवेश शुल्क रोख रक्कमेत स्विकारले जाणार नाही. तसेच अर्जासोबतच प्रवेश फी १ हजार रुपये भरावी लागेल. त्याचे विवरण अर्जावर दिलेल्या ठिकाणी भरून पाठवणे आवश्यक आहे. 

विशेष म्हणजे प्रवेश अर्ज प्रवेश शुल्कासह भरून पाठविण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट रोजी सायं ७ वाजेपर्यंत असेल. यानंतर आलेल्या प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. ज्या संस्था एकांकिका सादर करणार नाहीत, त्यांची रक्कम कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही. लेखकाची परवानगी व रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे (डी.आर.एम.) प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी त्या त्या संस्थांची असेल, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे (डी.आर.एम.) प्रमाणपत्र सादरीकरणाच्या आधी जमा करणे बंधनकारक आहे. 

तर लेखनाच्या पारितोषिकासाठी नवीन संहितेचाच विचार केला जाईल. प्राथमिक फेरीतूनच सदर एकांकिकांची पारितोषिकासाठी निवड केली जाईल. एकांकिकेच्या स्वच्छ अक्षरात किंवा टंकलिखित, तीन प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रती न जोडल्यास लेखनाच्या पारितोषिकेसाठी एकांकिकेचा विचार केला जाणार नाही. तसेच नियम व अटींचे पालन सहभागी संस्था, कलावंत व तंत्रज्ञांना करावे लागेल. तसे न करणाऱ्या संस्थेला स्पर्धेतून वगळले जाऊ शकते. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल आणि तो सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल.

प्राथमिक फेरीसाठी निर्मिती खर्चापोटी २ हजार रुपये दिले जातील, ती रक्कम सादरीकरण झाल्यावरच देण्यात येईल. प्राथमिक फेरीसाठी कुठल्याही प्रकारचा भत्ता किंवा प्रवास खर्च मिळणार नाही. स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या, परिषदेने ठरवून दिलेल्या केंद्रावरच संपन्न होईल. एका स्पर्धकास कोणत्याही एकाच एकांकिकेत आणि एकाच केंद्रावर सहभाग घेता येईल. 



एक केंद्र सोडून दुसऱ्या केंद्रात सहभाग घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित एकांकिकाच स्पर्धेतून बाद करण्यात येईल. पात्र परिचय स्पर्धेपूर्वी स्पर्धा प्रमुखांकडे विहित अर्जात देणे आवश्यक आहे. प्राथमिक फेरीसाठी एकांकिकेचा सादरीकरणाचा कालावधी कमीत कमी ३० मिनिटे व जास्तीत जास्त ४५ मिनिटे असेल. प्राथमिक फेरी ही पूर्णपणे तालीम स्वरूपाची असेल. 



अंतिम फेरीसाठी वरील कालावधीनुसार सादरीकरण, नेपथ्य, प्रकाशयोजना मांडणी आणि रंगमंच मोकळा करणे या संपूर्ण गोष्टींसाठी १ तासाचा कालावधी प्रत्येक एकांकिकेला दिला जाईल. वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळणे हे प्रत्येक संघाचे कर्तव्य असणार आहे. वेळेचे बंधन न पाळल्यास त्याचा परिणाम सादरीकरणाच्या गुणांवर होईल. एकांकिका सादर करण्यासाठी जी वेळ दिली असेल, त्याच वेळेवर एकांकिका सादर केली पाहिजे. त्यात बदल केला जाणार नाही.




प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत निवड झालेल्या एकांकिकांना प्रवास खर्च म्हणून ७ हजार रुपये अंतिम फेरीतील सादरी करणानंतर दिला जाईल. याबरोबरच अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, उत्कृष्ट द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये व दोन प्रोत्साहन पारितोषिकां साठी १५ हजार रुपये तर फक्त हाच याच स्पर्धेसाठी लेखन केलेल्या उत्कृष्ट लेखनासाठी सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये, उत्कृष्ट द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये व उत्कृष्ट तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये तसेच 

दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा व वेशभूषा, स्त्री अभिनय, पुरूष अभिनय यासाठी सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये व तृतीय ३ हजार रुपये तर ३ अभिनय उत्तेजनार्थ २ हजार रुपये (स्त्री व पुरुष), लक्षवेधी अभिनेता स्त्री व पुरुष ३ हजार रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.

 
Top