भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील बाणगंगा नदी पात्रामधून वाळू माफिया कायम वाळूचा उपसा करत असून हा वाळू उपसा पोलीस प्रशासन व महसूल यांच्या कृपाशीर्वादानेच होत असल्याचे या भागातील नागरिकांमधून बोलले जात आहे.
दि. 25 जुलै रोजी पहाटे भूम तालुक्यातील मौजे चिंचपूर शिवारामध्ये वाळू उपसा करणारा टिप्पर बाणगंगा ते चिचपूरकडे जात असताना काही शेतकऱ्यांनी टिपर अडवले. टिप्पर जाण्यामुळे आमचे नुकसान होत आहे. या ठिकाणाहून टिप्पर घेऊन जाऊ नका असे सांगितल्यानंतर वाळू माफियांनी शेतकऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र त्या ठिकाणी टिप्पर व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत असणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी वाळू असणारा टिपर सोडून दिला. टिप्पर सोडून का दिला याच्याबद्दल पोलीस प्रशासनातील एकही कर्मचारी बोलण्यास तयार नाहीत.
गोलेगाव ते बेलगाव या नदीपात्राच्या दरम्यान रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपसा चालूच आहे. या वाळू उपसां करणाऱ्यांवर ठोस कारवाई होणे आवश्यक असताना यांना कोणाचा आशीर्वाद मिळत आहे. त्यामुळे वारंवार अवैध वाळू उपसा करताना कसल्याही प्रकारे भीती न बाळगता वाळू माफिया बिनधास्तपणे वाळू उपसा करताना दिसत आहेत. वाळू माफियांवर कडक कारवाई व्हावी. अशी या नदी पात्रातील शेतकऱ्यांची मागणी आहे.