कळंब (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे धाराशिव आणि बीड जिल्ह्यासाठी चे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते शिक्षक भवन कळंब येथे रविवार दिनांक 1 जून रोजी संपन्न झाले.
या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे अध्यक्षपद राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक भुषवणार असा नियम आहे. त्यानुसार यावर्षी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षपद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवती येथील उपक्रमशील शिक्षक धम्मदीप सवाई यांनी भूषविले. त्यासोबतच संस्थेचे सदस्य भारत मोहिते, नानासाहेब मुळीक, अध्यक्ष सचिन लांडगे, श्रीमती आशा पवार या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
राज्यस्तरीय परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, परीक्षा पॅड आणि रोख रक्कम 501 रुपये असे बक्षीस देण्यात आले. तर शाळास्तरावर प्रथम तीन क्रमांकांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी अशा स्वरूपाचे बक्षीस देण्यात आले.
स्पर्धा परीक्षेचे जीवनातील महत्त्व, त्यासाठी करावी लागणारी तयारी, अचूकता, नियमितपणा, भविष्याची वाटचाल याविषयी प्रास्ताविकात श्री सचिन लांडगे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक बिक्कड, सिद्धेश्वर मेदने, नितीन ढगे, विश्वास भोसले यांनी परिश्रम घेतले. सुट्टीत आयोजित केलेल्या या बक्षीस वितरण कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.