तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील मोरडा येथील तळे फुट प्रकरणास  बेकायदेशीर चालु असलेले खडीक्रशर कारणीभूत असल्याने आमच्या मालकीच्या शेतजमीनीचे व पिकाचे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामा करुन आर्थिक मदत देण्यात यावी. संबंधीत खडी क्रशर चालकावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी बाधीत मनिषा नागनाथ शेंबडे या दाम्पत्यांनी तहसिलदार यांना निवेदन देवुन केली.

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, दिनांक 29/05/2025 रोजी रात्री झालेल्या पावसामुळे मौजे मोरडा ता. तुळजापूर येथील पाझर तलाव फुटल्याने गट नं. 75 मधील शेतजमीनीचे व पिकाचे नुकसान झाल्याने पंचनामा करुन शासनाकडुन आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी करून नागनाथ दगडु शेंबडे, मनिषा नागनाथ शेंबडे मौजे मोर्डा ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे शेतजमीन असुन सदर क्षेत्रामध्ये ऊसाचे पीक होते. गट नं. 75 मधील खातेदार राहुल भारत पवार याची जमीनीतील बेकायदेशीर गौणखनिज (दगड) उत्खनन वारंवार चालु असुन सदर खानीमध्ये वारंवार ब्लास्टींग केली जाते. सदर खानितील दगड व खडी हे तेथे असलेल्या पाझर तलावामध्ये टाकल्याने व ब्लास्टींगमुळे तेथील पाझर तलाव कमकुवत झाला. दिनांक 29/05/2025 रोजी रात्री झालेल्या पावसामुळे पाझर तलाव फुटल्याने गट नं. 75 मध्ये आमच्या शेतीचे व शेतात असलेल्या ऊस या पिकाचे पुर्णपणे नुकसान झालेले आहे. आमचे कधीही न भरुन येणारे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यास पुर्णपणे बेकायदेशीर चालु असलेले खडीक्रशरचे मालक व प्रशासन हे जबाबादार आहेत.

तरी  दिनांक 29/05/2025 रोजी रात्री झालेल्या पावसामुळे मौजे मोर्डा ता. तुळजापूर येथील पाझर तलाव फुटल्याने आमच्या मालकीच्या शेतजमीनीचे व पिकाचे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामा करुन आर्थिक मदत देण्यात यावी. संबंधीत खडीक्रशर चालकावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अशी विनंती केली आहे. या प्रकरणाची चौकशी  महसुल विभाग कधी करणार व या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार अशी चर्चा चर्चिली जात आहे.

 
Top