भूम (प्रतिनिधी)- भूम येथील श्री शिवाजी भूम तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. शुक्रवारी (दि.13) उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 15 जागांसाठी एकूण 73 उमेदवारांनी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आ. राहुल मोटे यांचे निकटवर्तीय गौरीशंकर साठे यांचा अनुसूचित जाती मतदार संघातून एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध मानली जात असून लढतीचे खरे चित्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

भूम येथील शिवाजी तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची मुदत डिसेंबर 2020 मध्ये संपली होती. त्यानंतर ही निवडणूक लांबली होती.प्रशासनाने सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने त्यानुसार शिवाजी भूम तालुका खरेदी विक्री संघाच्या 15 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विकास सोसायटी मतदार संघ 4 जागा, इतरमधून 1 जागा, वैयक्तिकमधून 5 जागा, महिलांसाठी 2 जागा, इतर मागास वर्गामधून 1 जागा, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी 1 जागा, अ.जा. 1 जागेचा यात समावेश आहे. यासाठी 511 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये वैयक्तिक मतदार संघातून 459, विकास सोसायटी मतदार संघातून 35 तर इतर संस्थांमधून 17 मतदारांचा समावेश आहे. दि.9 ते 13 जून दरम्यान उमेदवारी दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार एकूण 73 इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. दि.16 जून रोजी अर्जाची छाननी, दि. 17 रोजी वैध अर्जाची यादी जाहीर करणे, दि.1 जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असून दि.2 जुलै रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 13 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी मतदान संपल्यानंतर मतमोजणी केली जाणार आहे. या खरेदी विक्री संघाची स्थापना 29 जानेवारी 1985 रोजी झाली असून स्थापनेपासून सुरूवातीस स्व महारुद्रबप्पा मोटे व नंतर माजी आमदार राहुल मोटे यांच्या गटाची या संघावर सत्ता राहिलेली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांच्या गटांने ही अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चर्चेला जात आहे.

 
Top