धाराशिव (प्रतिनिधी)- मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाशी संबंधित असलेले कॉम्प्युटर डिझाईन सॉफ्टवेअर ऑटोकॅड आणि कटिया या विषयावर नुकतेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात प्रशिक्षण संपन्न झाले.
फक्त अभियांत्रिकीची पदवी घेऊन सद्या चालत नाही, तर सध्याच्या स्पर्धेच्या युगात विविध कौशल्यावर आधारित, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संबंधित विभागातील ज्ञान घेणे, स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी सीडीएस ट्रेनिंग सेंटर धाराशिव चे संचालक फिरोज मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल एक महिना हे प्रशिक्षण महाविद्यालयाच्या कॅड लॅब मध्ये आयोजित केले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ विक्रमसिंह माने म्हणाले की,शहरी भागामध्ये अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या प्रशिक्षणासाठी हजारो रुपये फी भरावी लागते. परंतु अत्यंत अल्प फी मध्ये महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेले आहे. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटच्या कामात याचा नक्कीच उपयोग होईल. विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रीज साठी लागणारे वेगवेगळे मॉडेल्स, प्रोजेक्ट बनविण्याचे कौशल्य या प्रशिक्षणातून आत्मसात केले आहे . एखाद्या पार्ट ची डिझाईन कशी करावी? हेही त्यामुळे त्यांना लक्षात येणार आहे.
महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे विभाग प्रमुख डॉ. डी डी दाते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही एक अभियांत्रिकीची प्रमुख शाखा असून विद्यार्थ्यांनी डिग्री सोबतच सॉफ्टवेअर संबंधित कोर्सेस केल्यामुळे प्लेसमेंट चा रेशो या वर्षी हाय जाणार आहे.तसेच सद्य परिस्थितीत आणि गरजेनुसार पुन्हा एकदा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची वाढती गरज लक्षात घेता आम्ही या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनीही याला भरघोस असा प्रतिसाद दिला. त्याबरोबरच आम्हाला असा विश्वास आहे की,नॅशनल कंपनी सोबतच मल्टी नॅशनल कंपनीमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी प्लेस होतील.
या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून प्रा एस पी बिरादार यांनी काम पाहिलं.तसेच प्रा एस डी शिंदे, प्रा आर एम शेख, प्रा बी.जी कदम यांनी विशेष सहकार्य केले. सतत एक महिना चाललेल्या या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे विभाग प्रमुख डॉ डी डी दाते यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले.